Tuesday, October 02, 2018

कॉफी विथ काकू


बाबांनी इहलोकाची यात्रा संपवल्यानंतर त्यांची व त्यांच्या कार्याची ओळख समविचारी अनोळखींना व्हावी या साठी मी जमेल तसे प्रयत्न करीत आलो आहे. ते माझे कर्तव्यच आहे, त्यात काहीच जगावेगळे नाही पण बाबांच्या 'एकला चालो रे' जीवनातून प्रेरणा घेण्यासारखे मात्र बरेच काही आहे, ते सर्व इच्छूकांना कळावे एवढा एकच हेतू या धडपडीमागे असतो.

२०१६ चा मे महिना होता. बाबांना जाऊन जेमतेम सहा महिने झाले असतील. बाबांना प्रिय असलेला तठस्थपणा बाळगून मी आपल्या कामात मग्न होतो - मन प्रसन्न होते, उद्विग्न होण्यासारखे कोणतेच विचार सतावत नव्हते का जुन्या आठवणी दाटून आल्या नव्हत्या. आभाळ काळोखून आले नसताना जणू वीज पडावी तशी बाबांकडची मंडळी कशी होती, कशी आहेत हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा आपोआप प्रकट झाली. असे काही करण्याची इच्छा आधी कधीच झाली नव्हती. मात्र आकाशवाणी समजून मी मनात आले ते प्रत्यक्षात साकार करण्याचे ठरविले. 

रक्ताचे नाते असलेल्या काही अति विशिष्ट, जगजेत्या तज्ञ मंडळींशी माझे संबंध अतिविशेष असल्याने माझ्या या पादचारी सोहळ्याला त्यांची उपस्थिती नव्हती हे सर्वार्थाने योग्य झाले म्हणायचे, उगीच त्यांच्या गुळगुळीत,चकाकत ठेवलेल्या सामाजिक प्रतिष्ठेला तडा गेला असता, आणि वर त्यांच्या त्या जीवघेण्या सुस्काऱ्यांचा आणि तिरस्कार-रसाने बरबटलेल्या कटाक्षांचा, शब्दांच्या आणि सुरांच्या पलीकडला असा, आघात भेट म्हणून सहन करावा लागला असता.    

त्यामुळे मनात आले तसे, आणि शक्य झाले तेवढ्या, लोकांना तडक आमंत्रण दिले. कार्यक्रमाचा हेतू मुळातच उद्दात होता. निर्मळ भेटी घडतील, सुख दुःखाच्या चार गोष्टी होतील, सर्वांची खुशाली कळू शकेल अशा प्रकारचे वातावरण निर्माण करायचे असे मी मनोमन ठरवले होते. कार्यक्रमाचा सर्व खर्च आपणच करायचा, कोणाकडेही मदतीसाठी याचना करायची नाही हे माझ्या स्वभावाला अनुसरूनच असल्यामुळे या खर्चाला भार मानण्याचा प्रश्नच नव्हता.  

आपल्याकडील माणसांच्या (आणि त्यांच्या मुलांच्याही) नसानसात उग्र स्वरूपाचे राजकारण भिनलेले असते ही साधी गोष्ट मी विसरलो नसलो तरी तात्पुरती बाजूला सारली होती, मनातली 'आकाशवाणी' आणि ओळखीच्या लोकांचे 'दूरदर्शन' यांचा सुतराम संबंध नाही याची मला जाणीव होती तरीही मी त्यांचा मेळ बसवण्याचे धाडस केले. त्याचा व्हायचा तो परमाणु परिणाम होणार याची खात्री नव्हती पण कल्पना नक्कीच होती. त्या विस्फोटाची नोंद घेण्याआधी काही जणांचे मनापासून आभार मानायचे आहेत ज्यांनी या कार्यक्रमाच्या हेतूला ओळखून त्याला साजेशी वागणूक केली

या मोजक्या मंडळीत मीना आत्या, कुंदा आत्या, माणिक, वृंदा ताई, माधव दादा, अनिता, प्रशांत आणि माझी काकू सामील आहेत. या सर्वांनी कुठल्याही पवित्र्याशिवाय मोकळेपणाने गप्पा केल्या. त्यांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम कडू न ठरता आंबटगोड ठरला. 

अनुभवाने आलेल्या शहाणपणामुळे आता मला प्रत्येक बाबतीत विनोदबुद्धी शाबूत ठेवण्याची सवयच जडली आहे त्यामुळे तटस्थपणा बाळगताना मनमुराद हसता देखील येते, आणि उगाच धीर गंभीर चेहरे करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे या ऐतिहासिक संमेलनात भेटलेल्या काही बावनकशी नमुन्यांचा समाचार घेताना खंत कमी, गम्मत जास्त वाटतेय:

दोन अजब बहिणींनी या कार्यक्रमात उघडपणे आपले वैर प्रदर्शित करून एक वेगळाच बार उडवून दिला - त्यांच्यात कोणत्या कारणावरून बिनसले हे जाणून घायची आमची मुळीच इच्छा नसताना, त्यांचे पटत नाही हेच मुळी माहित नसताना, त्यांनी आमच्या शांत निरामय वास्तूला आपल्या हक्काचे कुरुक्षेत्र का केले कुणास ठाऊक? एकमेकांवर छुपे वाण सोडत दोघींनी आपल्या बेतालपणाची पुरेपूर साक्ष पटवली. त्या गैरहजर राहिल्या असत्या तर त्यांना केवढी तरी प्रतिष्ठा न मागता प्राप्त झाली असती. 

या दोघींच्या रडगाण्याच्या जोडीला त्यांच्या भावाचा तिटकारा आणणारा शहाणपणा देखील या निम्मिताने जवळून अनुभवण्याचे भाग्य लाभले - आपण स्वतः काही करायचे नाही, मात्र सर्वांना त्यांच्या कर्तव्याची उठ सुठ आठवण करून द्यायची आणि दिसेल त्यावर ताशेरे ओढायचे हा या महानुभावांचा आवडता छंद दिसतो. आपण कसे अंतिम सत्य कोळून प्यायलेले आदि शंकराचार्यांना लाजविणारे जगविख्यात संत आहोत आणि बाकीचे कसे अगतिकपणे विळविळणारे जंत आहेत हे पटवून देण्याची त्यांची केविलवाणी धडपड बघून त्यांची कीव करावीशी वाटते.

मात्र उत्सवमूर्ती म्हणून मिरवणाऱ्या एका आजी बाईची कथा सर्वात जास्त रोचक आहे - जगातील इतर सर्व नातवंडे कशी सुमार आणि भिकार आणि माझी नातवंडे कशी सर्वात हुशार हे सांगताना या सुविद्य बाई कधीच थकत नाहीत - त्यांची स्वतःच्या दुराभिमनावर असलेली श्रद्धा निस्सीम आहे - आणि सोयीचे राजकारण कसे खेळावे हे भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी यांच्या कडून शिकावे. निदान हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तरी एकदा एकत्र जमावे.

काही मुत्सद्दी मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होती जे ‘वारे कुठे वाहते आहे’ त्या प्रमाणे हालचाली करायच्या असे ठरवून आले होते. आपण किती हुशार असा यांचा गोड गैरसमज असावा कारण प्रत्येक शब्द तोलून मोलून बोलताना त्यांना पडणारे कष्ट चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असताना आपण कसे बेमालूमपणे समोरच्याला काबीज केले अशा समजात ते शेवट पर्यंत वावरले.

या सर्व सर्कस मधील प्राण्यांच्या करामतींनंतर रात्री 'कॉफी विथ काकू' हा प्रायोजित कार्यक्रम मात्र कायम लक्षात राहील असा जिव्हाळ्याचा ठरला. मे महिन्यातला उकाडा मी म्हणत असताना देखील गप्पा उत्तरोत्तर रंगल्या, कित्येक जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला… आणि हा सोहळा घडवून आपले बरेच काही शाबूत राहिले, बिघडले नाही, हे समाधान देखील पहाट होता होता लाभले.