Tuesday, January 05, 2016

वेगळ्या वाटेवरचा अवलिया


डॉ. रायकारांच्या काही निस्सीम चाहत्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की माझे बाबांविषयीचे मनोगत कुठल्या तरी वर्तमान पत्रात किंवा मासिकात छापून यावे आणि काहींनी तर यासाठी स्वतः जवाबदारी घ्यायची तयारी दर्शवली. बाबांबद्दल या साऱ्यांची आत्मीयता बघून मला गहिवरून आले आणि त्याबद्दल मी कायम त्यांचा ऋणी राहीन. पण एकंदर मिडियातील माणसे आणि त्यांची मानसिकता बघता त्यांच्या जवळपास देखील फिरकायचे नाही असे बाबांनी शेवटच्या दिवसांत ठरवले होते आणि माझे मत देखील वेगळे नाही … म्हणूनच हे मनोगत माझ्या ब्लॉग वर अपलोड करीत आहे …

डॉ. यशवंत रायकर (१९३२ - २०१५)
वेगळ्या वाटेवरचा अवलिया

आयुष्याची पायपीट येउन ठेपली आहे एका टप्प्या वर
कि जिथून पाहता येतंय अल्याड पल्याड
एक पहाड मी चढून आलो आणि उतार येथून सुरु होतोय

एकाच नजरेत मागचा मावतोय
साठ मैलांचा सारा टापू
नि त्यातून खुणावतायेत
ठळक पुसट उमटलेल्या
माझ्याच त्या पाऊलखुणा


बाबांची साठी पूर्ण झाली तेव्हा त्यांनी वरील ओळींनी सुरु होणारी "साठ मैल" नावाची अतिशय बोलकी कविता लिहिली होती. त्यांची प्रचलित ओळख लेखक म्हणून असली आणि लेखनात त्यांना विलक्षण गती असली तरी त्यांचा मूळ पिंड तो संशोधकाचा. त्यामुळेच कि काय लिहिताना तटस्थपणा कायम केंद्रस्थानी असे - हा ध्यास इतका कि अनेक वेळा त्याचा अनावधानाने अतिरेक होई पण "साठ मैल" मात्र भावनेची भीज आणि बुद्धीचे चीज यांची उत्तम सांगड होती जी ओढून ताणून आणली नव्हती - तिला "सिंहावलोकन" न म्हणता सहजच 'मागे वळून पाहताना ' ती ओघाओघाने रचली गेली होती. तशी कविता त्यांच्या कडून नंतर च्या २३ वर्षात परत लिहून झाली नाही याला बऱ्याच घटना आणि गोष्टी जबाबदार आहेत पण त्यांची मांडामांड करणे किंवा बाबांचे गुणगान करणे हा या मनोगता मागचा हेतू नव्हे.

कसे जगावे आणि कीर्ती रुपी उरण्याचा विचार न करता कसे मरावे - हे त्यांच्या वाचकांना कळावे - मग ते ओळखीचे असो वा अनोळखी, नात्यातले असो वा गोत्यातले, चाहते असो वा नसो - म्हणून एवढे मातृभाषेत लिहावेसे वाटले.

आजोबांच्या धाकात गुदमरून गेलेले बालपण, बाबांचा अकाली मृत्यू, आईने सोयीस्करपणे मुलांसोबत राहयचे टाळल्यामुळे लहान वयात झालेले अपार दुर्लक्ष, काका आणि आत्या यांच्या, तुलनेने कमालीच्या सुखवस्तू कुटुंबांकडून, झालेली टिंगल मिश्रित अवहेलना आणि त्यातून नाहक निर्माण झालेली लाचारीची आणि अपराधीपणाची भावना - याचा एकत्रित परिणाम त्यांच्या मनावर झाला असावा म्हणूनच कि काय भावी काळात एक प्रकारचे काटेरी आवरण घेऊनच ते वावरताना भासायचे. फारच मोजक्या लोकांना ते आवरण भेदून पलीकडच्या बावनकशी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडले आणि त्यांच्या सानिध्यात आपल्या विचारांची चौकट रुंद करता आली - कुठल्याही विषयात शिरताना आणि कुठलाहि निष्कर्ष काढण्या पूर्वी स्थळ-काळाचे भान ठेवणे प्राप्त आहे हे शिकता आले. बाकी बहुतांशी माणसे मात्र "विक्षिप्त माणूस" या सदरात त्यांना मोडून मोकळी झाली. यात नातेवाईक मंडळी आघाडी वर होती हे वेगळे सांगणे नको. त्यांना बाबांच्या तथाकथित विक्षिप्तपणाच्या सुरस कथा रंगवून त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करणे खूपच सोयीचे ठरले. नाहीतर खुद्द मुंबईत असलेल्या आपल्या वडिलोपार्जित घराचा हक्क सोडून गुजरात,मध्य प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यांना शिक्षण-नोकरी च्या निम्मिताने आपले घर मानण्याऱ्या आणि नंतर ८० च्या काळात परत मुंबईत येउन अठठेचाळीसाव्या वर्षी नव्याने सुरवात करणाऱ्या या अवलियाचे त्यांना कौतुक वाटल्याशिवाय राहिले नसते - पण एखाद्याच्या मोठेपणाला लहान भासवून आपला खुजेपणा कसा लपवता येईल या कडेच बहुतेकांचे लक्ष लागून राहिले होते.

'बालपणी चा काळ सुखाचा' म्हणायचे नशीब बाबांना लाभले नाही पण आपल्या दुखाचे स्तोम न माजवता त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. कमालीच्या चिकाटीने त्यांनी आपल्या उपजत चिकित्सक वृत्तीला जपले आणि एक एक पाउल पुढे टाकत आपले भविष्य स्वतः घडवले. अलिबाग च्या छोट्याशा विश्वातून बाहेर पडून कुणाच्या हि मदती शिवाय इतिहास आणि पुरातत्व या विषयात प्राविण्य मिळवले आणि पुरातत्व खात्यात मोलाची कामगिरी बजावली - ईशान्य भारतात मौलिक अशा स्वरूपाचे उत्खनन तर केलेच, इतिहासाकडे संदर्भाच्या चष्म्यातून तटस्थ पणे बघण्याचा नवीन दृष्टीकोन दिला. "Indian History: A Study in Dynamics" या त्यांच्या शोध निबंधाचे लंडन यूनिवर्सिटी च्या A L Basham या सारख्या जगभरच्या तज्ञांकडून कौतुक झाले. मात्र कुठल्याही नोकरीत - सरकारी असो व खाजगी - त्या कौतुकाचा व्यावहारिक दृष्ट्या काहीच लाभ झाला नाही, उलटपक्षी बहुतांश वरिष्ठ मंडळींनी त्यांच्या प्रतिभेला न्याय मिळवून देणे तर दूर, त्यांचा गैरफायदाच घेतला. पण अलिप्तपणा हा स्थायी भाव असल्याने त्यांनी क्षणिक अपेक्षाभंगाला नैराश्या कडे झुकू दिले नाही आणि शेवट पर्यंत वाचत-लिहित राहिले. भारताबाहेर पाऊल न ठेवता जगाच्या कानाकोपऱ्या बद्दल इतकी आस्था, उत्सुकता आणि माहिती बाळगणारा त्यांच्या सारखा माणूस विरळाच. नाहीतर "ग्लोब ट्रोटर" म्हणवण्यात भूषण मानणारे व आपली पर्यटनाची स्वनिर्मित भूक एकसारखी भागवणारे आणि तरीही आपल्याच कुंपणात अडकलेले आणि खोल रुतत चाललेले अनेक महाभाग आज गल्लोगल्ली आढळतात.

"आज पर्यंत मांडला होता शब्दांचा संसार, तेच धावून आले मदतीला नि सोबती साधायला" असे म्हणणाऱ्या बाबांनी माणसे ओळखण्यात मात्र भरपूर घोडचुका केल्या आणि नको त्या लोकांना नको इतके महत्व दिले - त्यात प्रामुख्याने पत्रकार आणि प्रिंट मीडिया वाल्या मंडळींचा भरणा अधिक. कदाचित संध्या छाया दाटून आल्यावर "वेचक" सोडून "वाचक" शोधण्यात काही काळ दवडला आणि काही संपादक-प्रकाशक मंडळींच्या संकुचित मनोवृत्तीची वीण असलेल्या विळख्यात गुरफटत गेले. कोणे एकेकाळी महाराष्ट्र टाइम्स च्या एका ज्येष्ठ पत्रकाराला, ज्यांना खास पत्रकारी थाटात बाबांकडून "मुंबई - ज्ञात व अज्ञात" सारख्या अतिशय लोकप्रिय सदराला अमुक मुदती नंतर चालूच ठेवावे अशी याचना अपेक्षित होती, त्यांना "आज पासून हे सदर इथेच समाप्त होत आहे" असे स्पष्टपणे कळवणारे बाबा काही काळ का होईना कुठेतरी हरवले होते पण लवकरच त्यांना जुना सूर गवसला आणि त्यांनी संपादकांच्या मागे खेटे घालणे तात्काळ बंद केले. या मंडळींनी त्यांच्या नावाचा यथायोग्य वापर केला व त्यात काही गैर नाही पण श्रेय देताना मात्र काटकसर केली याची चीड कमी आणि दु:ख जास्त वाटते.

आपण आपल्या लेखणीने जगभर क्रांती घडवत आहोत अशी पक्की खात्री असल्यासारखी ही मंडळी वावरतात त्याला आमचा काहीच विरोध नाही, उसन्या तत्वज्ञानाच्या जोरावर जग पालथे घालून 'ओरीजिनल' असल्याचा दावा करतात त्या बद्दलही तक्रार नाही पण कुणा विद्वानाला लिहायची संधी देऊन आपण फार मोठे उपकार करीत आहोत हे किमान गृहीत तरी धरू नये. कारण सगळे विद्वान एकाच साच्यातले नसतात. अर्थात यात बरीच चांगली मंडळी त्यांना लाभली ज्यांच्या मुळेच बाबा महाराष्ट्राला लेखक म्हणून चांगले परिचयाचे झाले.

मृत्यू ला सामोरे जाताना बाबांनी थेट न. चि. केळकरांची आठवण करून दिली आणि अशा काही ऐटीत दुनियेला शेवटचा सलाम ठोकला कि मागे राहिलेल्या मंडळींना आपसूकच कमालीचा धीर आला. शेवटच्या दिवसात एका अति उत्साही आप्तांनी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांना बाबांना तपासायला म्हणून आणले होते. हेतू निर्मळ होता म्हणून आम्ही विरोध केला नाही. डॉक्टरांनी आपला खास अंदाजात प्रश्न केला "बाबा काय होतंय? काय त्रास होतोय?" बाबांनी म्हटले "त्रास काहीही नाही, age is the only issue"

बाबांचे उत्तर ऐकून डॉक्टर मनातल्या मनात उडाले पण आपण आज एक नवीन प्रकार चा रुग्ण पाहिला या पलीकडे त्यांना काही कळले नसावे. शेवटच्या दिवसात बाबांचे श्रवण सुरु होते, याचा अर्थ त्यांना स्तवन किवा सांत्वन अपेक्षित होते हे त्या डॉक्टर साहेबांनी गृहीत धरले असावे. आणि त्या अतिउत्साही आप्तांची गम्मत वेगळीच "बाबा, उद्या चमत्कार होणार, तुम्ही ठणठणीत बरे व्हाल" असे मोठ्याने ओरडताना त्यांच्या गावीच नव्हते कि बाबा त्यांच्या बाळबोधपणाला हसत आहेत. दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला खरा पण तो बाबांनी घडवलेला - स्वतः च्या इच्छेने देह ठेवण्याचा.

वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी न. चि. केळकरांच्या स्मृतीस अर्पण करून आम्हाला उदयेय्शून काही ओळी लिहिल्या होत्या त्या अशा (बदलून लिहिलेल्या ओळींचे मनन व्हावे)

दिसो लागे मृत्यू परि न भिववु तो मज शके
तयाच्या भेटी चे सतत मजला ज्ञानचि निके


(पुढील दोन ओळी वगळून)

मला जन्मा येता तनुभरणकार्या कणकण
दिले पांचाभूती परत करणे ते मज ऋण


(पुढील दोन ओळी बदलून)

तदाधारे जैसा शिकत जगलो ते मज पुरे
तनुत्यागा ऐसा इतर मजला लोभचि नुरे


अखेर च्या दिवशी हे लिहिण्याची शक्ती किवा शुद्ध असेलच असे नाही म्हणून आताच लिहून ठेवले

शुभेच्छा!
तुमचा, बाबा
यशवंत रायकर


त्यांची शक्ती आणि शुद्ध त्यानंतर तब्बल १० वर्षे टिकून राहिली याहून आम्हाला लाभलेले मोठे भाग्य ते काय ….

- सुधीर रायकर, ठाणे